'आनंदाच्या शेतातला' "कला मोहोर" हा अगदी वेगळा उपक्रम आहे.
"कलामोहोर... कलेचा आनंद, कलाकाराच्या सान्निध्यात!" या शब्दांतच या नव्या संकल्पनेचा अर्थ सामावलेला आहे.
आनंदाचं शेत म्हणजे पर्यटकांचं आवडतं फार्म ऑफ हॅपिनेस हे कोकणातलं कृषिपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण!
वसंत ऋतूत मोहोरानं फुललेल्या आंबा काजूच्या बागेत कलांचा मोहोरही फ़ुलावा हा "कलामोहोर" या संकल्पनेचा हेतू. 'कलामोहोर'च्या निमित्ताने, नामवंत कलाकारांबरोबर आनंदाच्या शेतात राहुन, त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी अनुभवता येणार आहे मोजक्या रसिक पर्यटकांना.
कल्पना करा, की तुम्ही एका नामवंत वादक, गायक, चित्रकार, शिल्पकार व्यक्तींबरोबर एकाच घरात, अंगणात, बागेत, शेतात वावरणार, उठणार बसणार आहात. त्या कलाकाराच्या सानिध्यात... गप्पा मारत, चहा कॉफी पिताना, त्यांच्याच तोंडून त्यांच्या कलेबद्दल, त्यांच्या कलाजगताबद्दल, गप्पा ऐकणार आहात! या कार्यक्रमाला ना स्टेज असेल ना निवेदक, ना साउंड सिस्टीम, ना स्पेशल लायटिंग! तुमच्यात आणि या मनस्वी कलाकारांत अंतर असणार आहे ते जेमतेम चार पाच फुटांचं. त्यानं आपल्या कलेचा जादुई पेटारा उघडावा आणि आपण लहान मुलांच्या कुतूहलानं त्याच्याभोवती कोंडाळ करून जमावं... मग त्याने प्रत्येकाच्या कुतुहलाला तोंड देता देता त्या पेटार्यातून एकेक चमत्कारी नमुना बाहेर काढून दाखवावा!
हा फॉर्मल कार्यक्रम नाहीच... ही असणार आहे एक आनंदाची मैफल, आनंदाच्या शेतातली!
"आनंदाचं शेत कृषी पर्यटन होम स्टे” अर्थात “Farm of Happiness” मधला या वर्षीचा म्हणजेच 2024 चा 'कलामोहोर’, साजरा होत आहे आपला लाडका संगीतकार “कौशल इनामदार” यांच्या बरोबर.
कौशल इनामदार यांच्या समवेत ११ एप्रिल ते १३ एप्रिल आपल्याला राहाता येणार आहे आनंदाच्या शेतात. यात सहभागी होण्यासाठी तुम्ही कलाकार किंवा कलेचे विद्यार्थी असण्याची आवश्यकता नाही. पण तुम्ही रसिक मात्र असायला हवं!
“मराठी भाषेच्या अभिमान गीता”मुळे लोकप्रिय झालेल्या कौशलनं अनेक चित्रपट, नाटकं, टेलीफिल्म्सना अत्यंत विचारपुर्वक संगीतानं सशक्त केलं आहे. संगीत, काव्य, साहित्य, चित्रपट, अश्या अनेक विषयांवर त्यानं त्याच्या ब्लाॅग्समधून सखोल वैचारिक प्रबोधन केलं आहे. या सगळ्या कामांचे अनुभव, त्यामागची वैचारिक बैठक, त्याला त्याच्या प्रवासात भेटलेले गुरू, मैत्र, साथीदार, भावलेलं, न भावलेलं संगीत, त्यातून उमललेलं त्याचं संगीत हे सगळं “आनंदाच्या शेता”त त्याच्याच सहवासात राहून, त्याच्याच तोंडून एकायला मिळणार आहे. ते ही चक्क दोन-तीन दिवस. कधी घराच्या अंगणात, तर कधी शेतातल्या झाडाखाली तर कधी शांत मावळत्या सुर्याच्या साक्षीनं दरीच्या काठावर बसून! म्हणजे अगदी “लाभले आम्हास भाग्य…” अशीच आपली अवस्था!
कौशल इनामदार आणि त्यांच्या कलाप्रवासाविषयी जाणून घेण्याकरता काही लिंक्स् पुढे देत आहोत:https://kaushalsinamdar.in/
https://www.youtube.com/results?search_query=kaushal+inamdar
या तीन दिवसात काय काय घडेल?
११ एप्रिल - (दिवस १) दुपारी ४:००-७:००:
वाजल्यापासून पर्यटक पाहुण्यांचं आगमन, परिचय / ओळख पाळख, अनौपचारिक गप्पा होतील.
१२ एप्रिल - (दिवस २)
सकाळ सत्र- कौशल आणि सर्व पाहुण्यांसोबत एकत्र शेत फेऱटका (आनंदाच्या शेतीची ओळख)
यातही कौशल यांच्याशी गप्पा, कविता, गाणी उमलतील तशी आणि तितकी.
दुपार सत्र-
भोजन आणि विश्रामानंतर प्रश्नोत्तरं, गप्पा, होतील.
यातही कौशल यांच्याशी गप्पा, कविता, गाणी उमलतील तशी आणि तितकी आणि तितकीच
संध्याकाळ सत्र-
आनंदाच्या शेतात बाहेरच्या परिसरात फेरफटकासहज जमेल, उमजेल इतकंच निसर्ग आणि पक्षी निरिक्षण
आणि यातून आपसूक होतील त्या गप्पा, गायन, रसास्वाद, आपली सर्वांची कौशलबरोबर प्रश्नोत्तरं
रात्री “कौ-जागिरी”-
आकाशात चतुर्थीचा चंद्र असला तरी कौशल सारखा संगीतकाराच्या सहवासात कौ-जागिरीचा आल्हाददायक आनंद आपण सगळेशेतातल्या घराच्या अंगणात एकत्र घेउयात. हातात वाफाळती कॉफी आणि कौशलची मृदू मुलायम गाणं आणि आपल्या सगळ्यांचा थोडा विचारी, समंजस श्रोतृ-जागर
१३ एप्रिल - (दिवस ३)
सकाळ सत्र-
शेतातल्या काजूच्या झाडांखाली काजू गोळा करायला एकत्र फेरफटका
आणि हे करताना आपसूक होतील त्या गप्पा, गायन, कविता, रसास्वाद,
दुपार सत्र-
भोजन आणि विश्रामानंतर प्रश्नोत्तरं, गप्पा, होतील.
यातही कौशल यांच्याशी गप्पा, कविता, गाणी उमलतील तशी आणि तितकी आणि तितकीच
संध्याकाळ सत्र-
आनंदाच्या शेतात बाहेरच्या परिसरात फेरफटकामावळत्या सुर्याला पण कौशल नक्की काही छान ऐकवेल ज्याचा आनंद आपण सगळे घेऊच.
आणि यातून अर्थातच आपसूक होतील त्या गप्पा, गायन, आपली सर्वांची कौशलबरोबर प्रश्नोत्तरं
आणि कलामोहोर २०२४चा समारोप.
१४ एप्रिल - (दिवस ४)
सकाळी न्याहारी करून सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाकरता निघणे.
आणि या सगळ्याच्या मध्ये मध्ये… तुम्हाला शेतावर, निसर्गरम्य ठिकाणचा निवास आणि अस्सल मराठी, कोकणी ग्रामीण संस्कृतीतलं सुग्रास जेवण, न्याहारी मिळणार आहे, वेळच्या वेळी.
कलामोहोर २०२३
२०२३ मधल्या दुसऱ्या वर्षीच्या 'कलामोहोर'च्या मध्ये आम्ही आमंत्रित केलं होतं, प्रख्यात शिल्पकार श्री भगवान रामपुरे यांना.
आणि त्यांच्याबरोबर आनंदाच्या शेतात राहुन, त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी अनुभवायला सहभागी झाले होते काही मोजके रसिक पर्यटक पाहुणे.
संगीत, नृत्य, वादन यांसारखी सादरीकरणाची नसलेली शिल्पकला! तरीही तीन दिवस रसिक पर्यटक पाहुण्यांना खिळवून ठेवण्याची अवघड गोष्ट साधली ते रामपुरे सरांसारळ्या कसबी, अनुभवी शिल्पकारानं दिलेल्या शिल्प सादरीकरणानं. त्यांच्याख्या कलाकाराच्या सान्निध्यात राहून,म्हणजे एकाच घरात, अंगणात, बागेत, शेतात त्याच्या बरोबर जो अनुभव या पाहुण्यांना मिळाला... तो व्हिडिओतून मांडणं केवळ अशक्य! पण तरीही हा छोटासा व्हिडिओ, 'कलामोहोर' सारख्या आगळ्या वेगळ्या पर्यटन संकल्पनेची अनुभूती देण्याचा प्रयत्न!
कलामोहोर २०२२
२०२२ मधल्या पहिल्याच 'कलामोहोर'च्या निमित्ताने इथे रहायला आम्ही आमंत्रित केलं होतं, गुणी आणि नामवंत बासरी वादक श्री अश्विन श्रीनिवासन यांना. आणि त्यांच्याबरोबर आनंदाच्या शेतात राहुन, त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी अनुभवायला सहभागी झाले होते काही मोजके रसिक पर्यटक पाहुणे.
दोन दिवस अश्विनजींसारख्या कलाकाराच्या सान्निध्यात राहून, म्हणजे एकाच घरात, अंगणात, बागेत, शेतात त्याच्या बरोबर जो अनुभव या पाहुण्यांना मिळाला... तो व्हिडिओतून मांडणं केवळ अशक्य!
पण तरीही २०२२च्या कलामोहोर उपक्रमाचा छोटासा व्हिडिओ बनवला आहे, या पाहुण्यांच्याच शब्दांतून त्या जादुई अनुभवाची अनुभूती देण्याचा प्रयत्न म्हणून!
या व्हिडीओची लिंक या पेजच्या तळाशी दिली आहे… ती नक्की पहा आणि आश्विनजींच्या बासरीवादनाचा आनंद घ्या!
"कलामोहोर 2024" उपक्रमाचे दर
कलामोहोरकरता एकूण उपस्थिती २८ व्यक्तींपर्यंत मर्यादित अाहे.
व्यवस्था १
आनंदाच्या शेतातील आमच्या घरात कलामोहोर पाहुण्यांकरता एकूण ६ रूम्स असून या पैकी एक आमंत्रित कलाकार पाहुण्याकरता राखीव असेल
बाकी ५ पैकी प्रत्येक रूममध्ये ४ व्यक्तींचा निवास (शेअरींग पद्धतीने) अपेक्षित आहे. प्रत्येक रूममध्ये एक डबलबेड आणि दोन सिंगल बेड (कॉट्स) असतील. प्त्येक रूमला स्वतंत्र बाथरूम (इंग्लिश टाॅयलेटसह) उपलब्ध आहे.
व्यवस्था २
या रूम्स मधील २० व्यक्तींचा निवास भरल्यास अतिरिक्त ८ जणांच्या निवासाची सोय आनंदाच्या शेतापासून १५ मिनीटांच्या अंतरावर असलेल्या गावातील अन्य होम स्टेमध्ये केली जाईल. येथेही वरीलप्रमाणेच व्यवस्था असेल. रात्री विश्रामाकरता या घरापर्यंत एकत्र सोडण्यासाठी आणि सकाळी आवरून पुन्हा आनंदाच्या शेतावर पोहोचण्याकरता सुमो गाडीची व्यवस्था केली जाईल
एकूण कलामोहोर निवासाकरता प्रत्येक व्यक्तीसाठी दर रू. ११,०००/- आहे
यात समाविष्ट गोष्टी:
* 2 दिवस आणि 3 रात्री निवास (११ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४ वाजता चेक-इन - १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता चेक-आउट)
* कलाकाराचा सहवास आणि त्याच्या कलेची सादरीकरणे.
* सकाळचा चहा / कॉफी / दूध
* चहा / कॉफी / दुधासह नाश्ता
* शाकाहारी दुपारचे जेवण
* चहा / कॉफी / दूध
* शाकाहारी रात्रीचे जेवण
* दिवसभर हवा असल्यास अधूनमधून चहा / कॉफी / कोकम सरबत
महत्वाचे:
संपूर्ण कालावधीसाठी बुकिंग अनिवार्य आहे.
आपल्ला सहभाग नक्की करण्यासाठी 100% रक्कम आगाऊ भरणे आवश्यक आहे.
स्थानिक शैलीतील मांसाहारी अन्न अतिरिक्त किंमतीवर आणि केवळ आगाऊ सूचना देऊन दिले जाऊ शकते.
संपूर्ण परिसरात आणि मुक्कामादरम्यान धुम्रपान आणि अल्कोहोलयुक्त पेये घेण्यास सक्त मनाई आहे.
कलामोहोर 2024 साठी तुमचे आरक्षण रद्द झाल्यास. (कृपया लक्षात ठेवा की इतर वेळचे पर्यटन आरक्षण रद्द करण्याचे धोरण कलामोहोर अनुभवाच्या आरक्षणाकरता लागू होत नाहीत)
कलामोहोर पर्यटन आरक्षण रद्द करण्याचे धोरण याप्रमाणे आहे:
1. तुमच्या चेक-इनच्या तारखेच्या किमान 21 दिवस आधी, आमच्याकडे रद्दीकरणाची पुष्टी झाल्यास तुम्हाला तुमची संपूर्ण आगाऊ रक्कम परत मिळेल.
2. तुमच्या चेक-इनच्या तारखेच्या 21-15 दिवसांच्या आत रद्दीकरणाची पुष्टी झाल्यास तुमच्या एकूण देय रकमेपैकी 50% आमच्याद्वारे रद्दीकरण शुल्क म्हणून कापून घेऊन येईल आणि उर्वरित रक्कम परत केली जाईल.
3. तुमच्या चेक-इनच्या तारखेच्या 15-0 दिवसांच्या आत रद्दीकरणाची पुष्टी झाल्यास तुमच्या एकूण देय रकमेपैकी 100% आमच्याकडून रद्दीकरण शुल्क म्हणून आकारले जाईल.